मालवणचे बंदर ६० ते ७०च्या दशकात कोकणच्या सागरी जलवाहतुकीचे मुख्य केंद्र होते. पूर्वीच्या काळी रस्ते वाहतूक सुरू होण्यापूर्वी बोटवाहतूक हाच मुंबईसारख्या ठिकाणी जाण्याचा एकमेव सुखावह मार्ग होता. मुंबई ते पणजी या बोटवाहतुकीचे मालवण हे प्रमुख केंद्र असल्याने मालवणचे बंदर दिवसभर चाकरमान्यांच्या वर्दळीने फुलून जायचे. मालवणची बाजारपेठही या बोटवाहतुकीवरच अवलंबून होती. त्यामुळे बोटवाहतूक सुरू असताना मालवण शहर गजबजलेले असायचे. मात्र १९७२ साली राजकोटच्या खडकावर आपटून झालेल्या ‘रोहिणी’ बोटीच्या दुर्घटनेनंतर मालवण बंदराला उतरती कळा लागली आणि १९७६ साली मालवणची बोटवाहतूक कायमची बंद झाली. यामुळे कोकणचा व पर्यायाने मालवणचा सुवर्णकाळ हरपला.
मालवण शहराला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. याच इतिहासात मालवणच्या बंदराचा सुवर्णकाळ दडला आहे. पूर्वीच्या काळी मालवणची नाळ मुंबईशी जुळली होती. पोटापाण्यासाठी मुंबई गाठण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गावात राहून चांगली नोकरी मिळणे दुरापास्त असताना मुंबईमध्ये गिरणी, कारखान्यांच्या ठिकाणी सहज नोक-या उपलब्ध होत असल्याने काही तरी कर्तृत्व करून दाखवण्याचे सुख स्वप्न रंगवणारे तरुण मुंबईकडे आकर्षित होऊ लागले होते. यामुळे प्रत्येक घरातील एकतरी तरुण मुंबईला कामानिमित्त स्थायिक झाला होता. यातूनच मुंबईच्या मनिऑर्डरवर येथील अर्थव्यवस्था अवलंबून होती.
पूर्वी रस्ते वाहतूक आतासारखी विकसित झाली नव्हती. मुंबईकडे जायचे म्हटले तर युनियनच्या गाडीने कोल्हापूर- पुणे- मुंबई असा प्रवास करावा लागत होता. तांबडेबुंद व खाचखळग्याचे रस्ते, प्रवासात इप्सीत स्थळी नियमित वेळेवर पोहोचण्याची शाश्वती कमी असल्याने कोकणची माणसे मुंबईला जाण्यासाठी बोटवाहतुकीचा पर्याय निवडत. त्यामुळे मालवणच्या बंदराला व पर्यायाने येथील बाजारपेठेला चांगले दिवस आले होते. १०० ते ५० वर्षापूर्वी आतासारख्या रिक्षा, सहासिटर किंवा भाडयाच्या गाडया नसल्याने शहर आणि तालुक्यातील खेडयापाडयातून येणा-या प्रवाशांसाठी बैलगाडीची सोय असायची.
मुंबईतील भाऊचा धक्का येथून दुपारी १२.३० वाजता पणजीच्या दिशेने निघणारी बोट जयगड, जैतापूर, रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड, आचरा आणि मालवण बंदर येथून पणजीला जायची व पणजीहून साडेअकरा- बारापर्यंत मालवण बंदरात येऊन येथील प्रवासी घेत मुंबईकडे मार्गस्थ व्हायची. मालवण बंदरात बोट येण्याचा एक ठराविक मार्ग होता. मुंबईहून बोट बंदरात प्रवेश करताना राजकोटला वळसा घालून सिंधुदुर्ग किल्ला आणि धोनतारा खडकाला बगल देत आत यायची. शहरातील सोमवार पेठ स्मशानाजवळ सर्वात उंच असलेल्या सुरुच्या झाडास समांतर बोट येथे प्रवेश करायची. या ठिकाणाला आजही ‘हिरवी बत्ती’ असे संबोधले जाते.
बोट बंदरात येताना भरती- ओहोटी बघून उभी केली जात असे. परंतु उभी करताना बोटीचे तोंड हिरव्या बत्तीकडे केले जात असे. बोट बंदरात ठराविक ठिकाणी उभी रहावी म्हणून शंभर दिडशे फुटांवर बोटीचे नांगर समुद्राच्या पाण्यात सोडले जात असत. बोटीवरून प्रवासी आणि त्यांचे सामान आणणारे पडाव प्रथम धक्क्याला लागायचे. त्यात बोटीवरून आपल्या पाहुण्यांना आणण्यासाठी जाणारी आणि या निमित्ताने बोट पाहण्याचा उद्देश असणारी मंडळी असायची. त्यांना २ आण्यांचा पास काढावा लागत असे. मालवण नगरपरिषदेच्या सध्याच्या भाजी मार्केट असलेल्या ठिकाणी बोट वाहतूक करणा-या बॉम्बे स्टीम नेव्हीगेशन कंपनीचे ऑफिस होते.
मालवण बंदरात बोट येतानाचे दृश्यदेखील फार विलोभनीय असायचे. बोटीची यायची वेळ पहाटेची असल्याने संपूर्ण बोटीतच दिव्यांचा लखलखाट असायचा. पाण्यावर तरंगणारे बोटीचे भलेमोठे धूड पाहून एखादी तीन-चार मजली इमारत पाण्यावरून तरंगत तर येत नाही ना? असा भास व्हायचा. १९६५ च्या सुमारास बोटीच्या तिकिटाचा लोअर क्लास १३ रुपये १० पैसे, अप्पर क्लास २१ रुपये आणि केबीन १०५ रुपये असा दर होता. मालवणच्या बंदरात दिपावती, तुकाराम, सेंट झेविअर, कोकणची राणी- माझी आगबोट कंपनी, लिलावती, चंद्रावती, सेंट अॅन्थोनी, इंडियन स्टीम नेव्हीगेशन कंपनी, रामदास, हिरावती, रोहिदास, चंपावती अशा बोटींच्या सफरी असायच्या. रत्नागिरी बोट रत्नागिरी स्टीम नेव्हीगेशन कंपनीची होती. तर हिरावती बोट मफतलाल कंपनीची होती. सरिता ही बोट कोकण शक्ती कंपनीच्या मालकीची तर कोकण सेवक ही बोट प्रथम चौगुले कं पनीकडे होती. नंतर चौगुले कंपनी बंद झाल्यानंतर काही काळ मोंगल लाइन कंपनीच्या ताब्यात होती.
बी. एस. एल. कंपनीने कोकण लाइन आगबोट सेवेतून माघार घेतल्यानंतर चौगुले कंपनी काही वष्रे कोकण मार्गावर बोट वाहतूक करीत होती. या बोटीतून दररोज १२०० ते १५०० प्रवाशांची येण्या-जाण्याची सोय होती. पूर्वीच्या काळी मुंबई- मालवण- वेंगुर्ला अशीच बोटवाहतूक सुरू होती. १९ डिसेंबर १६६१ रोजी गोवा विलीन झाल्यानंतर आगबोट पुढे पणजीपर्यंत प्रवासी वाहतूक करू लागली. मालवणच्या बंदरात दररोज तीन बोटीच येत असत. बोटवाहतूक सुरू असताना मालवणचे बंदर गजबजलेले असायचे. परंतु सरकारच्या आडमुठया धोरणामुळे १९७६ साली येथील बोटवाहतूक कायमची बंद झाली. ३० सप्टेंबर १९७६ ला मोंगल लाइन कंपनीने आपला गाशा गुंडाळला. डिसेंबर १९७२ ला रोहिणी बोट दुपारच्या सुमारास मालवण बंदर करून मुंबईला जाण्यासाठी बंदराबाहेर पडत असताना राजकोटजवळ खडकावर आपटून दुर्घटनाग्रस्त झाली.
या दुर्घटनेनंतर मालवण बंदर धोकादायक झाल्यामुळे मालवणची बोटवाहतूक बंद झाली. यामुळे कोकण किनारपट्टीवरील सर्व बंदरे ओस पडून मालवणचे वैभवाचे दिवस संपले. व्यापाराला उतरती कळा आली. मालवणचा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हयाचा व्यापारी संबंध मुंबई व कोल्हापूर या मोठया शहरांवर अवलंबून होता. सर्व प्रकारच्या जीवनाश्यक वस्तू समुद्रमार्गे मुंबईहून जहाजाने मालवण बंदरात येत असत. घरासाठी वापरावयाचे लाकूड, मंगलोरी कौलेही जहाजाने येत असत. मालवणच्या बाजारपेठेवर आजूबाजूची खेडी अवलंबून होती. यामुळे येथील अर्थकारणात बंदराचे महत्त्व मोठे होते. मात्र जलवाहतूक बंद झाल्यानंतर येथील अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली. पुन्हा एकदा मुंबई- गोवा जलवाहतूक सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून या प्रयत्नांना यश आल्यास या बंदराचे गतवैभव पुन्हा परत येण्याची शक्यता आहेत.
No comments:
Post a Comment