Tuesday, 5 June 2018

कोकणातला पाऊस

पावसाळा  हा केवळ एक ऋतू नाही.

*तो एक सण आहे.*

आणि तो साजरा करायला तुम्ही कोकणात असायला हवं.

कोकण पावसात जितकं रसरशीत दिसत तितकं दुसऱ्या कुठल्याही ऋतूत नाही.

इतर ठिकाणी पावसाने रबरबाट होतो तो कोकणात नाही.

घ्यावी ती फ्रेम आणि काढावा तसा फोटो.

कोकणातल्या पावसात पिण्यात जी मजा आहे ती जगात कुठेही आणि कधीही नाही.

कोकणातला पावसाळा मला खास खवय्येगिरीसाठी आवडतो.

पावसाच्या पहिल्या पंधरवड्यात पालापाचोळ्यात चुकार दडून राहिलेल्या काजुना कोंब फुटतात. इवल्या इवल्या झाडांच्या तळाशी चिकटलेली डाळक खाणं हे सुख आहे.
Batti किंवा बॅटरी घेऊन पहिल्या पासवाच्या पुरात पालापाचोल्याखाली दडलेल्या खेकडे पकडन्याची मज्जा औरच.....

सुकट घालून केलेली आठळ्यांची भाजी हे आणखी एक.
भाजलेला कोळीम, सुक्या बल्याचा रस्सा,आणि दान्याची भाकरी

सोसाट्याच्या वार्यात नदीकाठचे दोन चार माड धारातीर्थी नक्की पडलेले असतात. कोयता कुर्हाड घेऊन  माडाचा शेंडा सोलून त्यातला त्यातला गर खायचा तो कोकणात.

तुफान पावसात मासे मिळणे अवघड. पण असल्या पावसात सुक्याची मजा और.

वाफाळलेला चहा आणि कांदाभजी म्हणजे पाणी कम चाय.

मिरगाचा कोंबडा, चढणीचे मासे हे सगळे ठीक.

पण खास गम्मत खेकड्यांच्या रश्श्यात.

जातिवंत खवय्या रंगीत खेकड्यांच्या वाटेला जात नाही.

खेकडा खावा तर गोड्या पाण्यातला.

तो ओढ्यातला आणि आपण पकडलेला असेल तर क्या कहने ??

खेकडे पकडणं हि एक कला आहे.  ते येरागबाळ्याचे काम नोहे.

खडतर तपश्चर्येने ती सिद्धी प्राप्त होते.

२२ वर्ष कोकणात काढूनही मला ती कला काही साध्य झालेली नाही.

मोठाल्या दगडाच्या खाली दोन्ही हात घालून नांगी विस्फारलेला खेकडा अलगद काढणे आणि नदीतल्या खळाळत्या पाण्यात चाहूल न देता, ओढ्यात बिळाच्या तोंडावर आलेला खेकडा  तीराच्या धनकुलीने वेधणे, हे फिरत्या थाळीतील माशाच्या डोळ्याचा वेध घेण्याइतके अवघड.

कुठून कुठून आणलेली कोंबड्याची आतडी किंवा बोंबील चे पोले गडद्यामध्ये दडवून ठेवावी आणि सकाळी पहाटे ओढ्याच्या प्रवाहात  खेकड्यानी भरलेला गडदा आणावा.  यात जी गम्मत आहे ती आणखी कशात आहे का ??

गरीत गांडूल अडकवून नदीच्या गरवन्यात खूपच मज्जा....
पात्या,डोकरु,पिटलांड्या

आभाळ कोसळत असावं दोन दोन दिवस. मिट्ट काळोख. लाईट गेलेला.  पोटात दोन पेग. आणि तांदळाच्या भाकरीबरोबर खेकड्याचा रस्सा.....